कंटाळा ! कंटाळा !! कंटाळा !!!

कंटाळा.. प्रचंड कंटाळा.. ! सध्या रूटीन फारच बोर होतय. दिवाळी झाली. किल्ला केला, कंदिल केला, अंक आणले, माळा/लायटींग केलं. मनसोक्त फराळ हाणला. माहेरच्या, सासरच्या मंडळींबरोबर गेट टू गेदर केली. पण ह्या सगळ्याची मजा ४ दिवसच टिकली. नंतर परत कंटाळा यायला लागला.
टेनीस खेळायला जावसं वाटत नाही. पळावसं त्याहून वाटत नाही. सकाळी उठून तासभर पेपर वाचत बसतो पण पळायला बाहेर पडत  नाही. सायकल घ्यायची तर बजेट मध्ये बसत नाही. पोहायला जायचं तर सकाळी थंडी वाजते. बसमध्ये कंटाळा येतो. संध्याकाळची बस अनकम्फर्टेबल आहे. त्यात बसून (बसण्याच्या पोझिशन वर डिपेंडींग) पाय किंवा मान दुखते. सहा महिने फॉलोअप करूनही कंपनी बस काही बदलत नाही! ऑफिसमध्ये जायला यायला फारच वेळ लागतो!
बाकी ज्या गोष्टी करतो त्या बर्‍याचदा उसनं अवसान आणून करतो. सध्या उसनवारी फार वाढल्याने अवसानही येत नाहीये!
सोशल लाईफ फारसं उरलं नाही. म्हणजे कोणी मित्र मैत्रिणी अमेरिकेतून आले तरच मित्रांशी भेटी गाठी होतात. कारण असलेले सगळे मित्र मैत्रिणी बाहेरच आहेत. इथे आहेत त्यांना आम्ही नसण्याची सवय होऊन गेली आहे. शिवाय न भेटाण्याची इथली नेहमीची यशस्वी कारणे आहेतच. ऐनवेळी टांग मारणे, दिलेल्या वेळेपेक्षा खूप उशीरा येणे, वन वे कम्युनिकेशन वगैरे वगैरे..
ऑफिसातही खूप काही वेगळं घडतं अश्यातला भाग नाही. रोजचे तेच ते इश्यूज, तीच पाट्या टाकणारी लोक, त्यांच्या डोक्यावर बसा, आपली कामं पुढे सरकवा.. कधी कधी असं वाटतं ही कामं करून ते आपल्यावर काही पर्सनल फेवरच करयातय की काय! शिवाय ह्या सगळ्यातून 'इनोव्हेटीव्ह' वगैरे गोष्टी करण्याच्या अपेक्षा. मग ऑफिसमधल्या अवसानाची उसनवारीही वाढते. तरी बरं टीम चांगली आहे आणि बॉसेस ऐकून घेणारे आहेत.
आजचं ह्यावरचं एक डिलबर्ल्ट सापडलं. ह्या सिच्युएशेनला अगदी परफेक्ट!
http://dilbert.com/strips/comic/2007-06-23/  ह्या लिंकवरून साभार!



तर हा कंटाळा घालवण्याचा तुर्तास एकच उपाय आहे तो म्हणजे रियाशी खेळणे, तिचे बोबडे बोल ऐकणे आणि तिच्या रोजच्या नवनव्या करामती पहाणे आणि जे मी अगदी मनापासून एन्जॉय करतो!


भर पावसात कात्रज सिंहगड... !

कैलास मानस यात्रेच्या सरावासाठी म्हणून गेल्या २/३ महिन्यांपासून दर शनिवारी सिंहगडावर जायला सुरुवात केली होती. ज्याच्या बरोबर जातो तो मित्र उत्साही आहे, दांड्या मारत नाही शिवाय दोघच जण जात असल्याने फार फाटे फुटत नाही. त्यामुळे सलग ७ शविनार गेलो.  गड चढायचा प्रमुख उद्देश्य हा व्यायाम असल्याने भजी, झुणका भाकरी वगैरे गोष्टींसाठी आम्ही थांबत नाही. चढून झालं की पाच दहा मिनीटं थांबून त्याच पावली परत. त्यामुळे कोथरूडहून ५:१५ ला निघून आम्ही ८:३०/८:४५ ला घरीही परततो. सुरुवातीला भर उन्हाळा होता. नंतर हळूहळू हवा चांगली सुधारायला लागली. पावसाला सुरुवात झाल्यावर तर एकदम धमाल यायला लागली. एकदातर संपूर्णवेळ जोरदार पाऊस सुरू होता. वाटेवरून पाणी वहात होतं, एकदम पावसाळी सहलीचं वातावरण. नंतर शिल्पाचा भाऊ, सुहासही आमच्या बरोबर यायला लागला.

तश्यातच पुणे रनिंगच्या फेसबूक पानावर कात्रज ते सिंहगड ट्रेकींग स्पर्धेची जाहिरात वाचली. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तीन तीनच्या टीमने भाग घ्यायचा होता. आम्ही तिघे भाग घेऊ असं वाटत असतानाच सुहासने ऐनवेळी डिच दिला.. त्याची काहितरी ऑफिसची ट्रिप ठरली. नेमकं त्याच आठवड्यात मला ऑफिसमध्ये जोरदार काम आलं. मग गौतमने बरेच प्रयत्न करून तिसरा पार्टनर शोधला. ते आयोजक अगदी पूर्णपणे पुणेरी होते! त्यांची रजिस्ट्रेशन प्रोसेस इतकी क्लिष्ट होती, आणि सगळी कागदपत्र प्रत्यक्ष येऊन दिली पाहिजेत अशी अट .. जग कुठे चाललय.. हे काय करतायत.. पण ते असो.  परत गौतमनेच बरीच फाईट मारून ते काम केलं.

ट्रेकच्या दिवशी सकाळी छान रिमझीम पाऊस होता.. मधेच थांबतही होता. सुरुवातीच्या ठिकाणी म्हणजे कात्रज बोगद्याच्या वर एकदम उत्साही वातावरण होतं.  सुमारे ४०० लोकं होते. ७ ला ट्रेक सुरु झाल्यावर काही जण उत्साहात पळतच सुटली! ह्य रूटवर साधारण तेरा टेकड्या आहेत. पहिलीच टेकडी चांगली दणदणीत आहे. पळत सुटलेले लोक लवकरच ढेपाळले. आम्हाला डोंगर चढायची सवय झालेली असल्याने हा पहिला डोंगर फार अवघड गेला नाही. चढून तर गेलो पण उतरताना फार वाट लागली. कारण चिखल ! जवळजवळ सगळेच जण घसरगुंडी करत होते. ट्रेकला चांगले आणि सुयोग्य  बुट असणं किती गरजेचं असतं ह्याची खात्री त्या उतारावर पटली. रूटवर अधेमधे चेक पॉईंट होते. प्रत्येक ठिकाणचे स्वयंसेवक अतिशय चांगले होते आणि नीट बोलत होते. आधीच्या अनुभवाच्या अगदी विरुद्ध ! ह्या चेक पॉईंटला तिघेही असल्या शिवाय ते पुढे जाऊ देत नव्हते. त्यात आमच्या तिसर्‍या पार्टनरला फार काही सराव नव्हता त्यामुळे मी आणि गौतम चेक पाँईटला जाऊन उभं रहायचो मग तो मागून यायचा. थोड्या टेकड्या पार केल्यानंतर सिंडगड दिसायला लागला पण मधे अजून काही टेकड्या होत्या. आणि प्रत्येकवेळी भला मोठा उतार उतरायचा आणि मग तेव्हडाच मोठा चढ चढायचा असा प्रकार होता. एकंदरीत स्टॅमिना, गुडघे आणि बुटांचा चांगलाच कस लागला. शेवटचा चेक पॉईंटवर उकडलेली अंडी, एनर्जी ड्रिंक्स वगैरे होते. मुख्य संयोजक तिथे उपस्थित होते. त्यांना आमचा रजिस्ट्रेशनचा अनुभव सांगितला. त्यांनी आमचे आक्षेप साफ फेटाळले आणि असं होऊच शकत नाही वगैरे वगैरे मतं मांडली.. (पुन्हा पुणेरीपणा !) पण आम्हीही आमचे मुद्दे सोडले नाहीत. पण आम्हांला अजून आतकरवाडी गावापर्यंत पोहोचायचं असल्याने चर्चा आवरती घेत पुढे निघालो. आपल्याकडे ही स्पर्धा, मॅरेथॉन शर्यती वगैरे गोष्टी सुरु झालेल्या आहेत ही खरोखरच खूपच चांगली गोष्ट आहे पण अजून म्हणावी तितकी व्यवसायिकता त्यात आलेली नाही हे मात्र नक्की.

आतकरवाडी गावात म्हणजे सिंहगड पायथ्याशी, उतरणारा शेवटचा उतार हा आत्तापर्यंतच्या सगळ्या उतारांचा बाप होता. इतकी प्रचंड घसरडी वाट की ह्या वाटेवर आत्ता ट्रेक ठेवलाच कसा असा मला प्रश्न पडला. माझे कैलास मानससाठी घेतलेले चांगले बूट असल्याने कमी त्रास झाला पण बर्‍याच जणांचे खूप हाल झाले. घसरगुंड्या करून करून लोकांच्या ट्रॅकपँटची अक्षरशः चाळणी झाली. अखेर आम्ही आतकरवाडी आवात पोहोचलो अआणि तिथे वाहत्या ओढ्यात हात (आणि पाय) धुवून घेतले. हे सगळं होईपर्यंत ४ वाजले मग शेवटची  सिंहगडाची चढाई सोडून देऊन आम्ही टमटम पकडून घरी परतलो.

हिरव्यागार डोंगरांवर भर पावसात हा ट्रेक करायला खूप धमाल आली. वातावरण इतकं सुंदर होतं की ते अनुभवताना फोटो काढण्याचं डोक्यातही आलं नाही आणि आलं असतं तरी ते फारसं शक्यही झालं नसतं. आता एकदा पौर्णिमेच्या रात्री करायचा विचार आहे. बघू कसं काय जमतय ते. सध्या चालू असलेल्या ट्रेकींग फॅडमधला एक उपक्रम पार पडला!
 

सुवर्णकाळाची स्वप्न दाखवणारं कांस्य पदक

राष्ट्रउभारणी ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. राष्ट्राच्या निर्मितीनंतर राजकीय धोरणे, आर्थिक स्थैर, परराष्ट्रीय संबंध ह्याच बरोबर सामाजिक जडणघडण सुद्धा योग्य दिशेने होणं अतिशय महत्त्वाचं असतं. राष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत जी वेगवेगळी क्षेत्रं महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यातील एक म्हणजे क्रीडा क्षेत्र. क्रिडाक्षेत्रातला सहभाग आणि यश हे देशातील नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतं, देशाला स्वतःची एक ओळख मिळवून देतं आणि एकीची, राष्ट्रीयत्त्वाची भावना रुजवतं. खेळांमध्ये जातिपाती, धर्म, प्रांत वगैरेच्या भिंती दुर ठेऊन राष्ट्रीय अस्मितेला जागृत करण्याचं तसच संपूर्ण राष्ट्राला सामूहिक आनंद देण्याचं एक सामर्थ्य असतं. आजच्या काळात क्रिडाक्षेत्रातलं अर्थकारण ही सुद्धा अतिशय महत्त्वाची बाब बनलेली आहे. आज विकसित देशांबरोबरच अनेक विकसनशील देश, देशाच्या जडणघडणीतलं क्रिडाक्षेत्राचे महत्त्व ओळखून क्रिडासंस्कृती आपल्या देशात जाणीवपूर्वक रुजवत आहेत. एशियाड, कॉमनवेल्थ, ऑलिंपीक ह्यांसारख्या जागतिक स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी विविध कार्यक्रम आखत आहेत आणि खेळाडूही उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करत क्रिडाक्षेत्रात यश मिळवण्यासाठी, आपल्या देशाचं नाव उंचावण्यासाठी जिवाचं रान करत आहेत.
ऑलिंपीक सारख्या जागतिक स्पर्धेमध्ये भारताने सुवर्णपदक मिळवणं ही अशक्य बाब नक्कीच नव्हती. भारताच्या हॉकी संघाने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात मिळून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ८ सुवर्णपदकं मिळवली आहेत आणि त्यातलीही सहा सलग! भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतरच्या स्पर्धांमधल्या पदक समारंभात तिरंगा फडकवला गेला असेल, भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजवली गेली असेल, खेळाडू साश्रू नयनांनी भारावून गेले असतील, भारतीय पाठीराख्यांनी जल्लोष केला असेल! पण हे सगळे कधी तर आमच्या पिढीच्या जन्माच्या आधी! भारताने हॉकीतलं शेवटचं सुवर्णपदक मिळवलं ते १९८०च्या मॉस्को ऑलिंपीकमध्ये जेंव्हा अमेरिकाधार्जिण्या देशांनी (ह्यात पाकिस्तानही होते) स्पर्धेवर बहिष्कार घातला होता. आमची पिढी ऑलिंपीक बघायला लागली त्यावेळी ऑलिंपीकमध्ये भारतासाठी अतिशय निराशाजनक चित्र होतं. अनेक कारणांनी हॉकी संघाची वाताहात झालेली होती. वैयक्तिक खेळांमध्ये अव्वल भारतीय खेळाडू आणि जागतिक खेळाडू ह्यांच्यात पडलेली दरी फार मोठी होती. बरीच राष्ट्रे स्वतंत्र होऊन काही प्रमाणात स्थिर झाल्याने क्रिडाक्षेत्रातली स्पर्धाही विलक्षण वाढली होती. गुरबाचन सिंग रांधवा, फ्लाईंग सीख मिल्खा सिंग आणि सुवर्णकन्या पी.टी. उषा ह्यांची वैयक्तिक पदकं अगदी थोडक्यात हुकल्याने भारतीय क्रिडाप्रेमी हळहळले होते. एकदा तर महिला हॉकी संघ (हो! महिला हॉकी संघच) पदकापर्यंत पोहोचणार असं वाटत असताना अचानक हरला होता. एकंदरीत १९८० नंतरच्या लॉस एंजेलीस, सोल आणि बार्सिलोना अशा सलग तीन स्पर्धांमध्ये भारताची पाटी कोरीच राहिली होती. त्यामुळेच अटलांटा ऑलिंपीक स्पर्धेत टेनिसपटू लिएंडर पेसने मिळवलेलं पदक ही भारताच्या क्रिकेटेतर क्रिडाक्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची घटना म्हणावी लागेल. हे जरी कांस्यपदक असलं तरी ह्या पदकाने जुन्या पिढीतल्य भारतीयांना गतवैभवाची आठवण करून दिली तर नवीन पिढ्यांना देशाने ऑलिंपीक स्पर्धेत पदक जिंकण्याचा अनुभव दिला.

तसं बघायला जाता लिएंडरचं पदक हे स्वतंत्र भारतातल्या भारतीयाने मिळवलेलं दुसरं वैयक्तिक पदक. खाशाबा जाधवांनी कुस्तीत कांस्यपदक मिळवल्यानंतर तब्बल ४४ वर्षांनी मिळवलेलं. परंतु ह्या ४४ वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. खाशाबा जाधवांनी पदक मिळवण्याच्या बातमीला त्या काळात वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर स्थान मिळालं नव्हतं. खाशाबांचे जंगी सत्कार समारंभ वगैरेही झाले नव्हते. केवळ ५ वर्षे वय असलेल्या देशाने खाशाबांच्या यशाची मर्यादीत प्रमाणावर दखल घेतली होती. त्याउलट अटलांटा ऑलिंपीकच्या वेळी भारत देश पन्नाशीच्या उंबरठ्यावर होता. त्याचवर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात भरली होती. देशातील वातावरण क्रिकेटमय झालेलं होतं. इतर खेळ 'यश मिळाल्याशिवाय पैसा मिळत नाही आणि आर्थिक पाठबळाशिवाय यश मिळत नाही' ह्या चक्रात अडकलेले असताना, क्रिकेटने यश आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टींचं गणित बर्‍यापैकी जमवलेलं होतं. क्रिकेटेतर खेळांसाठी चांगली गोष्ट एव्हढीच की खुल्या अर्थव्यवस्थेमुळे आलेल्या बर्‍याच देशी विदेशी दूरसंचार वाहिन्यांवरून भारतीयांना ऑलिंपीकसारख्या जागतिक स्पर्धा घरबसल्या पहाण्याची संधी मिळत होती.

लिएंडर म्हणजे वेस आणि जेनिफर ह्या पेस दांपत्याचं अपत्य. वेस पेस भारताकडून हॉकी खेळत. ते १९७२च्या ऑलिंपीक कांस्यपदक विजेत्या संघाचे सदस्य होते तर जेनिफर पेस भारतीय बास्केटबॉल संघाच्या सदस्य होत्या. घरात इतकी तगडी क्रीडा पार्श्वभूमी असल्याने लिएंडरने कुठलातरी खेळ खेळणं स्वाभाविक होतं. लिएंडरने वयाच्या पाचव्या वर्षी टेनिसची रॅकेट हातात घेतली तर बाराव्या वर्षी अमृतराज टेनिस अ‍ॅकेडमीमध्ये टेनिसचे धडे गिरवायला सुरुवात केली. अवघ्या पाच वर्षात तो ज्युनियर गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आणि त्याने मानाची विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकली. पुढे तो भारतीय डेव्हिस कप संघाचा अविभाज्य घटक बनून गेला आणि त्याबरोबरच व्यावसायिक टेनिसमध्ये एकेरी आणि दुहेरी प्रकारात चमकू लागला. डेव्हिस कप स्पर्धेत अधून मधून आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकाच्या खेळाडूंना धक्केही देऊ लागला. लिएंडर त्याकाळचा भारताचा अव्वल टेनिसपटू असला तरी अटलांटा ऑलिंपीक स्पर्धेच्यावेळी तो जागतिक क्रमवारीत तब्बल १२६व्या स्थानावर होता.

१९९६च्या सरत्या उन्हाळ्यात २४ वर्षांचा लिएंडर ऑलिंपीक स्पर्धेसाठी भारतीय चमूबरोबर अटलांटाला दाखल झाला. त्याकाळात तो काही जबरदस्त टेनिस खेळत होता अशातला भाग नाही. त्यामुळे क्रिडा रसिक तसेच समिक्षक, टेनिस मधल्या एकेरीच्या कुठल्याही पदकासाठी लिएंडरला दावेदार मानत नव्हते. अटलांटा ऑलिंपीक मधले टेनिसचे सामने अटलांटा शहरापासून अर्ध्यातासाच्या अंतरावर असलेल्या स्टोन माऊंटन परिसरात होणार होते. अटलांटातल्या कडक उन्हाळ्यात सगळ्या खेळाडूंच्या शारिरीक क्षमतेचा कस लागणार हे नक्की होते.
पहिल्या फेरीत लिएंडरची गाठ पडली ती जागतिक क्रमवारीत विसाव्या स्थानावर असलेल्या अमेरिकन रिची रेनगर्बशी. रेनबर्गला घरच्या वातावरणाचा तसेच प्रेक्षकांच्या पाठींब्याचा फायदा मिळणार होता. दोन्ही खेळाडू अतिशय जिद्दीने खेळत होते. आपली सर्व्हिस न गमावता गेमची संख्या नेहमी बरोबरीत ठेवत होते. अखेर पहिला सेट टायब्रेकरला गेला. टायब्रेकरमध्ये लिएंडर अडखळला आणि रेनबर्गने टायब्रेकर ७-२ अशा फरकाने जिंकून सेट खिशात घातला. प्रेक्षकांनी जल्लोष केला. दुसरा सेटही खूप चुरशीचा झाला. पहिल्या सेट प्रमाणेच तो ही टायब्रेकरला गेला. अर्थात ह्या वेळी मात्र पेसने हार मानली नाही. दुसर्‍या सेटचा टायब्रेकर त्याने ९-७ असा खेचून आणला. गरम हवेत अतिशय दमणूक करणारे दोन सेट खेळल्यानंतर रेनबर्गला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली आणि लिएंडरने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. दुसर्‍या फेरीत त्याची गाठ होती ती व्हेनेझुएलाच्या निकोलस परेराशी. तुलनेने सोप्या प्रतिस्पर्ध्याशी असलेला हा सामना लिएंडरने दोन सरळ सेटमध्ये जिंकला. ह्या विजयानंतरही त्याची दखल घेण्यास फार कोणी उत्सुक नव्हते कारण अमेरिका तसेच युरोपीय देशांचे तगडे खेळाडू अजूनही स्पर्धेत होते. तिसर्‍या फेरीत लिएंडर समोर स्विडनच्या थॉमस एन्क्विस्टचे आव्हान होते. एन्क्विस्ट म्हणजे क्रमवारीत दहाव्या क्रमांकाचा खेळाडू आणि त्यावेळचा एक उगवता तारा मानला जात असे. एन्क्विस्टचाही लिएंडरने सरळ सेटमध्ये फडशा पाडला. आता मात्र क्रिडासमिक्षकांना लिएंडरची दखल घेणं भाग पडलं. पुढच्या फेरीत लिएंडरची गाठ पडली ती इटालियन रझानो फुर्लानशी. फुर्लान लिएंडरपेक्षा बर्‍याच वरच्या क्रमांकावर असूनही लिएंडरने अगदी सहज विजय मिळवला. भारतीय पथकातले इतर खेळाडू निराशाजनक कामगिरी करत असताना लिएंडर एकामागून एक फेर्‍या जिंकत असल्याने सगळ्यांच्या नजरा लिएंडरवर खिळल्या. आता उपांत्य फेरीत त्याच्यासमोर आव्हान होते ते दस्तुरखुद्द आंद्रे अगासीचे! अव्वल मानांकित अगासी सुरवातीपासूनच सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता आणि तो ह्या स्पर्धेत जबरदस्त टेनिस खेळत होता. सामना सुरु झाल्यावर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखत पहिला सेट टायब्रेकरला नेला. बघता बघता आघाडी घेत लिएंडर सेट पॉईंट पर्यंत पोहोचला परंतु जिद्दी अगासीने अव्वल क्रमांकाला साजेसा खेळ करत दोन सेट पॉईंट वाचवून सेट खेचून घेतला आणि दुसरा सेट त्यामानाने सहज जिंकून सामना जिंकला. पराभवानंतरही लिएंडरला पदक मिळवायची अजून एक संधी होती. कांस्य पदकासाठी त्याचा सामना ब्राझिलच्या फर्नांडो मेलिगनीशी होणार होता. अशातच लिएंडरच्या मनगटाला दुखापत झाल्याची बातमी आली. सामना वादळी पावसामुळे पुढे ढकलला गेला. ह्यात अजून भर म्हणजे सामना सुरु झाल्यावर लिएंडरला लय सापडेपर्यंत त्याने पहिला सेट ६-३ फरकाने गमावला सुद्धा! इतकं हातातोंडाशी आलेलं पदक निसटयत की काय ह्या काळजीने भारतीय क्रीडा रसिकांच्या तोंडचं पाणी पळालं. पण व्यावसायिक स्पर्धेपेक्षा देशाचे प्रतिनिधीत्त्व करताना लिएंडरचा खेळ खूप बहरतो, त्याच्यात दहा हत्तींच बळ संचारतं ह्याची प्रचिती ह्या स्पर्धेतही आली. मनगटाच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करत जिद्दीने पुढचे दोन सेट जिंकून त्याने कांस्य पदक अक्षरशः खेचून आणलं. भारतीय पाठीराख्यांनी जल्लोष केला. पदकप्रदान समारंभात आंद्रे अगासी आणि सर्जी ब्रुग्वेरा सारख्या दिग्गज खेळांडूबरोबर आपल्यातला एकजण असलेला बघून भारतीयांची मान उंचावली! अनेक वर्षांत जे घडलं नाही ते आज घडताना पाहून तमाम भारतीय क्रीडा रसिक भारावून गेले होते. आपणही पदक जिंकू शकतो ही जाणीव झाली. लिएंडरच्या यशाचं देशभरात जोरदार कौतुक झालं.

लिएंडरच्या पदकाने रातोरात सारं बदललं का? तर अजिबात नाही! ह्या स्पर्धेनंतर दोन वर्षांनी झालेल्या आशियाई तसचं कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये पदकतक्त्यातला भारताचा क्रमांक आधीच्या स्पर्धांपेक्षा घसरला. क्रिडारसिकांकडून अजूनही क्रिकेटेतर खेळांना दुय्यम वागणूक दिली जात होती. जागतिक खेळांडूच्या तुलनेत भारतातले खेळाडू अजूनही खूप कमी पडत होते. पुढच्या सलग दोन ऑलिंपीक स्पर्धांत भारताने एकेका पदकावरच समाधान मानले होते. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे करनाम मल्लेश्वरी ही ऑलिंपीकमध्ये पदक मिळवणारी पहिला भारतीय महिला खेळाडू ठरली, तर राज्यवर्धन राठोडने पहिले वैयक्तिक रजत पदक जिंकले. पण लिएंडरच्या पदकामुळे भारतातील लोकांचा ऑलिंपीककडे पहाण्याचा दृष्टीकोन मात्र नक्कीच बदलला. त्या काळातले पालक आपल्या मुलांच्या खेळाकडे थोड्या गांभीर्याने पाहू लागले. खेळात गती असेल तर खेळातही करियर करता येऊ शकतं हा विचार हळूहळू रुजायला लागला. तसच ह्याच काळात माहितीच्या उपलब्धतेमुळे खेळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्याकडे लोकांचा कल वाढला. बदलत्या वातावरणामुळे ह्या काळात जी पिढी बाल्यावस्थेत होती, खेळांचे प्रशिक्षण घेत होती, ती पुढे उत्तम निकाल देऊ लागली. २००२ च्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली. २००६ आणि २०१०च्या स्पर्धांमध्ये तर भारताने अनुक्रमे तब्बल ५३ आणि ६५ पदके पटकावली. हीच कथा कॉमनवेल्थ स्पर्धेची. २००६च्या स्पर्धेत कामगिरी उंचावलीच पण घरच्या मैदानावर भरलेल्या २०१०च्या स्पर्धेत भारताने पदकांची शंभरी गाठून इंग्लड, कॅनडा सारख्या देशांना मागे टाकत पदकतालिकेत दुसरा क्रमांक पटकावला. विविध खेळांच्या जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चमकू लागले, विजेतेपदं मिळवू लागले. लहान स्पर्धेतलं हे यश ऑलिंपीकमध्ये न दिसेल तरच नवल! २००८च्या बिजींग ऑलिंपीक स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच अभिनव बिंद्राच्या रूपाने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं आणि भारताच्या राष्ट्रगीताची धून ऐकून आणि तिरंगा फडकताना पाहून भारतीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, तर २०१२च्या लंडन ऑलिंपीक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण सहा पदके पटकावून आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

आता तर सरकारी पातळीवर ऑलिंपीकमध्ये ४० पदके मिळवण्याच्या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी होत आहे. स्वत: लिएंडर पेस सकट काही वरिष्ठ खेळाडू ऑलिंपीक गोल्ड क्वेस्ट, मित्तल चॅंपियन ट्रस्ट सारख्या संस्थांमार्फत ऑलिंपीक मधल्या पदकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आज सुशील कुमार, विजेंदर सिंग, गगन नारंग, रोहन बोपण्णा, साईना नेहवाल, मेरी कोम, राही सरनौबत सारख्या वेगवेगळ्या खेळांत पारंगत खेळाडूंची फौज भारतात तयार होते आहे. टेनिस, बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स बरोबरच नेमबाजी, तिरंदाजी, जलतरण, बॉक्सिंग सारख्या खेळांकडेही अनेक जण वळत आहेत. इतर खेळांसाठी लागणार्‍या पायाभूत सुविधांचा हळूहळू का होईना पण विकास होत आहे. बॅडमिंटन/टेनिस सारख्या खेळांमधले सिटी लीग सारखे प्रयोग, वार्षिक मॅराथॉन स्पर्धांचे आयोजन अश्यांसारखे उपक्रम वेगवेगळ्या शहारांमध्ये केले जात आहेत. बाहेरच्या देशांसारखी क्रिडासंस्कृती आपल्या देशातही हळूहळू रुजत आहे. आज भारतीय क्रिडाप्रेमी क्रिकेटबरोबरच इतर खेळांमधल्या स्पर्धा तसेच एशियाड, ऑलिंपीकसारख्या जागतिक पातळीवरच्या क्रिडास्पर्धांमधल्या सुवर्णकाळाची स्वप्न पहात आहेत. पुढील स्पर्धांमध्ये भारत भरघोस यश मिळवेलच पण ही सुवर्ण काळाची स्वप्न पहायला निमित्त देण्याचं आणि भारतातल्या क्रिकेटेतर क्रिडाक्षेत्राला गती देण्याचं काम लिएंडर पेसच्या कांस्य पदकाने अगदी योग्यवेळी आणि चोख बजावलं!

-------------------------
'मायबोली.कॉम'वरच्या लेखन स्पर्धेतली ही माझी प्रवेशिका. ह्या प्रवेशिकेला तिसरे बक्षिस मिळाले!
http://www.maayboli.com/node/44145

प्रथमग्रासे मक्षिकापातः !

मागे नववीच्या सुट्टीत आईची एक मैत्रिण कैलास मानससरोवरच्या यात्रेला जाऊन आली आणि तिने तिच्या प्रवासवर्णनाची हस्तलिखित प्रत वाचायला पाठवली होती. तेव्हा कैलास मानससरोवराबद्दल पहिल्यांदा ऐकलं. लगेच मी दहावीच्या सुट्टीत जाऊ ? असं घरी विचारलं. पण एकंदरीत बर्‍याच अटींमध्ये ते बसणारं नव्हतं. नंतर शिक्षण, नोकरी, लग्न वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये ते मागेच पडलं. मग दिड वर्षांपूर्वी अनयाची मायबोलीवरची कैलास मानस यात्रेबद्दलची सुंदर लेखमाला वाचली आणि भारतात परतल्यावर लगेच इथे जायचच हे ठरवून टाकलं.

जानेवारीत परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाहिरात वाचल्या वाचल्या लगेच अर्ज भरून टाकला आणि इंटरनेटवर, पुस्तकांमध्ये जे जे काय सापडेल ते सगळं वाचून काढलं. अनयाच्या लेखमालेची पारायणं करून झाली!  एकीकडे व्यायाम वगैरे करणं सुरु होतचं. यात्रेसाठी निवड लकी ड्रॉ द्वारे केली जाते. आमचं कधी काही पहिल्या फटक्यात होतच नाही! इथेही नियमाला अपवाद नव्हताच. निवड न होता अर्ज वेट लिस्टमध्ये गेला. वेट लिस्ट क्रमांकही ५१ !!! त्यामुळे निवड व्हायची काही शक्यताच नाही असं गृहीत धरून टाकलं पण तरी एकदा अनयाला फोन केला. तिने खूपच धीर दिला आणि दिल्लीला फोन कर, निवड नक्की होईल असं सांगितलं. दिल्लीला फोनाफोनी, मेलामेली सगळं चालूच होतं. परराष्ट्र खात्याच्या लोक अगदी दिल्ली स्टाईलमध्ये.."हां हां.. जरूर यहा आजाईये भोलेबाबाकी कृपासे हो जायेगा कन्फर्म.. " म्हंटलं मला लेखी द्या की काहितरी.. मी ऑफिसमध्ये रजेच्या अर्जाबरोबर काय भोलेबाबांचा दाखला लाऊ का?! तर म्हणे कळवू तुम्हांला लवकरच.
त्याच दरम्यान कॉलेजमधला एक मित्र ऑफिसच्या बसमध्ये भेटला. त्याला म्हंटलं शनिवारी सकाळी सिंडगडावर येणार का ? तर तो हो म्हणाला. मग दर शनिवारी सकाळी सिंडगड, इतर दिवशी सकाळी ५-६ किलोमीटर चालणं असा व्यायाम सुरु केला. शेवटी एकदाचं परराष्ट्र खात्याकडून  कन्फर्मेशनच पत्र आलं! ऑफिसमध्ये सुट्टीसाठी मोर्चेबांधणी सुरुच होती. यात्रेचा अर्ज भरण्याचं नक्की केल्यापासून म्हणजे ऑक्टोबर पासून मधल्या एका आजारपणा व्यतिरिक्त एकही सुट्टी न घेता रोज पाट्या टाकून टाकून बरीच सुट्टी जमा केली होती.  सुट्टीचंही नक्की झालं. एव्हडं सगळं ठरल्यावर तयारीला एकदम जोर आला. इंटरनेट, पुस्तकं पुन्हा वाचली. खरेदीची यादी केली.  अनयाला भेटून आलो आणि तिच्याकडूनही टिप्स घेतल्या. एकंदरीत सगळेच कपडे घेऊन जावे असं वाटायला लागलं!!  बुट, सॅक, कपडे, खाऊ, आठवतील त्या सगळ्या गोष्टींची जय्यत तयारी केली. योगायोगाने आईची ती हस्तलिखित पाठवणारी मैत्रिणी मी निघायच्या आदल्या दिवशी पुण्यात होती. मी जाणार आहे हे कळल्यावर ती आमच्या घरीच आली. ती स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे तिने दिलेल्या टिप्स नुसार पुन्हा सामानात फेरफार केली. तिकडे सरकारला आपल्या कडून इन्डेम्निटी बाँड भरून दयावा लागतो, इतरही कागदपत्रं द्यावी लागतात त्याची सोय केली. कैलास मानससरोवरला जाणार्‍या प्रत्येक बॅचबरोबर भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून एक लायझनींग ऑफिसर (ग्रेड १ अधिकारी) असतो. हा पूर्ण बॅचचा प्रमुख आणि त्याला/तिला सगळे अधिकार असतात. आमच्या बॅचच्या एल.ओ. म्हणून तिहार जेलच्या डायरेक्टर जनरल श्रीमती विमला मेहेरा ह्यांची निवड झाली आणि त्यांच्या ऑफिसमधून माहिती विचारणा करण्यासाठी फोन आला.

अखेर सर्व सामान/सुमान, कागदपत्र, पैसे घेऊन एकदाचं आमच्या विमानाने दिल्लीसाठी उड्डाण केलं.  एअरपोर्टवर पेपरमध्ये वाचलं की दिल्लीला मान्सुन पोचला म्हणे आणि उत्तरेत काही ठिकाणी पाऊस सुरु आहे. दिल्लीला जाऊन बघतो तर व्यवस्थित उन! म्हंटलं पडून गेला असेल पाऊस. दिल्लीला दिल्ली सरकारतर्फे सगळ्या यात्रींची तीन दिवस रहायची-खायची सोय केली जाते. गुजराथी समाजमध्ये ही सोय मोफत असते. गुजराथी समाज म्हणजे गुजराथची एम्बसी आहे !! बोलण, खाणं, लोकं सर्व गुजराथीत. हिंदीत बोलल्यावर कपाळावर सुक्ष्म अठी उमटते. तिथल्या एसी डॉर्मिटेरीत बेड मिळाला. तिथेच दिल्ली सरकारच्या तीर्थयात्रा विकास समितीचे चेअरमन श्री. उदय कौशिक ह्यांचं ऑफिस आहे. तिथे जाऊन आल्याची नोंद केली. गुजराथी समाजात पोहोचल्यावर हाय, हॅलो, नमस्ते, गूड मॉर्निंग वगैरे सगळी अभिवादनं विसरून कोणालाही भेटल्यावर, निघताना वगैरे 'ओम नमःशिवाय' असच म्हणायचं हे कळलं! तिथे बाकीच्या यात्रींची ओळख झाली. दर बॅच प्रमाणे आमच्या बॅचमध्येही गुज्जूभाईंचा जोरदार भरणा होताच. मराठीचा झेंडा फडकवायला आम्ही एकटेच! मुंबई पुण्याचे दोन जण होते पण एकजण तमिळ तर एकजण तेलुगु भाषिक.

नंतर सगळ्या बॅचही ओळख परेड, देवाची पूजा, आरती वगैरे झाली. बॅच बाकी एकदम हायप्रोफाईल होती!! ४ डॉक्टर, ३ वेगवेगळ्या विषयांतले पीचडी डॉक्टर, १ शास्त्रज्ञ, १ डिसिपी, १ रेल्वे मत्रांलयातल्या अधिकारी (ह्या मागे एलओ म्हणून जाऊन आलेल्या होत्या.), २ कॉलेज प्रोफेसर, ३/४ शालेय शिक्षक! आणखी दोन आयटीवालेही सापडले. तिशीच्या आसपासचे आम्ही जवळजवळ दहा जणं होतो. त्यातल्या जवळ जवळ सगळ्यांना एक वर्षाच्या आसपासची मुलं होती आणि बायका मुलांची देखभाल करायला घरी थांबल्या होत्या. एकट्या आलेल्या बाया मात्र चाळीशीच्या पुढच्या होत्या. मुलं कॉलेज/नोकर्‍यांपर्यंत पोहोचली म्हणून आता यात्रेला आल्या.
दुसर्‍या दिवशी दिल्ली हार्ट अँड लंग इंस्टीट्यूट मध्ये सगळ्या मेडीकल तपासण्या झाल्या. त्या फारच जोरदार आणि डिटेलवार होत्या. दरम्यान आमच्या पुढे गेलेल्या दोन  बॅचेस बुधी आणि अलमोडा इथे अडकून पडल्याची बातमी आली. उद्या त्या पुढे सरकतील त्यामुळे आम्ही वेळेत निघू असही सांगितलं. मी तिथे अगदी दारासमोर बसून कसलातरी फॉर्म भरत असताना आमच्या एलओ मॅडम आल्या. माझ्या बॅजमुळे मी यात्री आहे हे त्यांनी ओळखलं आणि बोलायला आल्या. नाव वगैरे विचारल्यावर म्हणाल्या ' यू मस्ट बी अ स्टुडंट. वॉट डू यू स्टडी?' हा निष्कर्ष कशावरून काढला माहित नाही पण त्यावर 'स्टुडंट और मै ? ही ही ही .. मेरी त्त्वचा से मेरी उमर का पता ही नही चलता.. ही ही ही' असं उत्तर द्यायची फार फार इच्छा झाली!! पण म्हंटलं आधीच त्या तिहार जेलच्या प्रमुख.. उगीच पहिल्याच भेटीत अतरंगीपणा नको करायला.. ! एकंदरीत मॅडमचं व्यक्तिमत्त्व फारच रुबाबदार होतं.

गुजराथी समाजात कौशिकजींच्या ऑफिसमध्ये रोज हवन, पूजा, आध्यात्त्मिक पाठ वगैरे होतं असे. त्यातल सगळं पटलं नाही तरी आधी जाऊन आलेल्यांच्या सल्ल्यानुसार फार कंट्रोल करून शांतपणे सगळं ऐकून घेत असे.
दुसर्‍या दिवशी इंडोतिबेटन बॉर्डर फोर्सच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल रिपोर्टची तपासणी आणि त्यावरून सिलेक्ट की रिजेक्ट हे ठरणार होतं. तिथे सुरुवातीच्या सुचना झाल्यावर एकेकाची तपासणी सुरु झाली. भोलेबाबाच्या कृपेने आमच्या बॅचमधल्या ५९ साठ यात्रींपैकी ५७ जण पास झाले! सग़ळी कडे आनंदी आनंद पसरला. तिथे एका समितीतर्फे जेवण दिलं. ते लोकं फारच अदबीने वागत आणि आमची सेवा वगैरे करत होते. म्हणे यात्रींची सेवा केली की आम्हांला पुण्य मिळतं पण आपल्याला फारच अवघडल्यासारखं होतं.

नंतर गुजराथी समाजात परतल्यावर पहिली बॅच बुधीहून गुंजीला गेल्याची बातमी आली. मी घरी फोन वगैरे करून कळवलं की आम्ही वेळेवर निघू. मग काही जणांना सामान घ्यायचं होतं ते घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. दिल्ली मेट्रोने छान फिरून परत गुजराथी समाजात आलो आणि येऊन बघतो तर...........................तिथे एकदम शोककळा पसरली होती. काय झालं ते विचारलं तर कळलं की उत्तरांचलमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे यात्रेच्या मार्गाचं खूपच नुकसान झालं आहे. बरेच पुल वाहून गेले आहेत. पहिली बॅच बुधीहून गुंजीला गेली कारण गुंजीला हेलिकॉप्टर उतरू शकतं आणि लोकांना परत आणता येऊ शकतं. शक्य झालं तर ते पुढे जाऊन यात्रा करून येऊ शकतात आणि आल्यावर हेलिकॉप्टरने परतू शकतील. बुधीहून मागे फिरणं शक्यच नाहीये. दुसरी बॅच उद्या अलमोड्याहून परत फिरणार आहे आणि आमच्या पासून पुढच्या ८ बॅचेस रद्द केल्या आहेत. सगळ्यांची एक मिटींग झाली आणि कौशिकजींनी परतीच्या प्रवासाची सोय करायला सांगितली. सगळे खूपच उदास झाले. बंगलोरच्या सुमती मॅडम रडायलाच लागल्या. पहिली उदासीची एक लाट ओसरल्यावर सगळ्यांना उत्तरांचलमधल्या गंभीर परिस्थितीची जाणिव झाली. आणि परत भोलेबाबाच्या कृपेनेच आपण वाचलो असं ठरलं. (एकंदरीत गुजराथी समाजात घडणारी प्रत्येक गोष्ट ही भोलेबाबांनीच घडवलेली असते.) नंतर सगळेजण सुटलेच. स्वतःवरचं हसण्यासारखी गोष्ट होती. सगळ्यांनी आपापल्या बॅगांमधले पदार्थ काढले. माझ्याजवळचे डिंकाचे लाडू गुज्जू गँगमधल्या एकाने प्रसाद म्हणून सगळ्यांना अग्राह करून करून खायला लावले. त्यांचे ठेपले, रोटवगैरेही दिले. त्या दिवशी गप्पांची मैफील रात्री १/१:३० वाजेपर्यंत सुरु होती. एकतर मेडिकल पास झाल्याने सगळे जरा मोकळेपणाने बोलायला लागले होते आणि त्यातच ही बातमी समजली.

दुसर्‍या दिवशी सकाळी परराष्ट्र मंत्रालयात सगळ्यांना बोलवलं होतं. चायनीज विसा काढून आमचे पासपोर्ट परत आले होते आणि आता पुढे काय हे ठरवायचं होतं. आमच्या एलओ मॅडमही हजर होत्या. जर ह्यावर्षी यात्रा सुरु झाली तर नंबर दोनच्या आणि आमच्या बॅचला प्राधान्य दिलं जाईल आणि जर कोणाला ह्यावर्षी जमलं नाही तर पुढच्या वर्षीच्या निवडीत आमच्या अर्जांना प्राधान्य दिलं जाईल असं परराष्ट्र मंत्रालयातल्या अधिकार्‍यांनी सांगितलं. यायच्या आधी दिल्लीत परत एकदा मेट्रोने फिरून घेतलं आणि तिथे मस्त पंजाबी जेवणही जेऊन आलो. दिल्ली मेट्रो, रस्ते, पूल सगळं एकंदरीत फारच सुरेख, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं केलं आहे.

जवळ जवळ सहा महिने तयारी करून, मेडिकल टेस्ट पास होऊन अगदी  ऐनवेळी यात्रा रद्द झाल्याने फार म्हणजे फारच वाईट वाटलं. बॅच चांगली होती, बरोबरीची बरीच जणं होती. त्यामुळे मजा आली असती असं वाटतय. घरीही सगळे जण हळहळले. घरी कोणाचाच जाण्यासाठी विरोध नव्हता. सगळ्यांनी अगदी जोरदार पाठींबा दिला होता. ऑफिसमधली सुट्टी वगैरे सगळच जुळून आलं होतं. पण योग नव्हता हेच खरं.   उत्तरांचलमधली एकंदरीत परिस्थिती बघता मधे कुठे जाऊन अडकलो नाही आणि वेळेवर परत आलो ते ही बरच झालं. ही खरोखर भोलेबाबांची कृपा म्हणायची!

सरकारी पातळीवर यात्रेचं आयोजन, पत्रव्यवहार सगळं फारच व्यवसायिक पद्धतीने केलं जातं. एकंदरीत सरकारने सगळे निर्णयही खूप विचारपूर्वक घेतल्याचं जाणवलं. आमच्या एलओ मॅडम, भेटलेले एक दोन माजी  एलओ, परराष्ट्र मंत्रालयातले इतर अधिकारी इतके व्यवस्थित आणि आत्मविश्वासाने बोलत होते की 'सरकारी अधिकारी' म्हंटल्यावर जी प्रतिमा डोक्यात होती ती निश्चितपणे बदलली. आता ह्यावर्षी/पुढच्या वर्षी किंवा कधी यात्रेला जायला जमेल काहीच माहित नाही. पण आता यात्रेबद्दल आता इतकं वाचलं आहे की अगदी कधीही त्याबद्दल कन्सल्टेशन करू शकेन. यात्रेला जाण्याच्यानिमित्ताने चांगला नियमीत व्यायाम झाला आणि मेडिकल चेकअपही झाला. (तुका म्हणे त्यातल्या त्यात!)

जायच्या आधी ह्यावर्षीचं विंबल्डन बघता येणार नाही हे लक्षात आलं होतं. आता यात्रेच्या निमित्ताने रजा घेतलेलेलीच आहे तर ती रद्द न करता दोन आठवडे संपूर्ण विंबल्डन बघावं का असा विचार आता करतो आहे!

आज्जीच्या ओव्या...

आमची आज्जी लहान बाळांना झोपवताना काही विशिष्ट ओव्या म्हणायची. त्या अगदी पुर्वंपार चालत आलेल्या ओव्या असल्याने माझ्या बाबांच्या लहानपणी, मग आमच्या आणि मग नीरज, निशांत लहान असताना त्या म्हंटल्या गेल्या. आईच्या माहेरीही तिची काकू, आज्जी, आमची तिकडची आज्जी अशाच ओव्या म्हणत असत. दोन्ही कडच्या काही ओव्या वेगळ्या होत्या त्यामुळे आता त्यांचा एक सुपरसेट तयार झालाय!
रिया झाल्यावर महिन्या सव्वामहिन्यात आज्जी गेली. एखाद दिवसाचा अपवाद वगळता तिने रियाला झोपवण्यासाठी ओव्या म्हंटल्याही नाहीत कारण तिची स्वतःचीच तब्येत बरी नसायची. आता रियाला झोपवताना बाकी सगळे जण ओव्या म्हणतात आणि रोजच आज्जीची आठवण निघते. ह्या ओव्या कानाला फारच गोड वाटतात. त्यातला संकल्पना कालानुरूप नसल्या किंवा त्यात फार काही लॉजिक नसलं तरी छान वाटतात आणि मुख्य म्हणजे त्या बर्‍यापैकी लिंगनिरपेक्ष आहेत !आज्जी एकंदरीतच त्या इतक्या आश्वासक सुरात म्हणायची सगळीच बाळं अगदी शांत झोपून जायची. ह्यातल्याच काही ओव्या आज ब्लॉगवर टाकतोय.

अंगाई रे बाळा, तुझा लागून दे रे डोळा.
पापिणी चांडळा, दृष्ट लागी... ||१||

अंगाई, अंगाई, बाळ झोपी जाई.
बाळाला म्हणूनी, दुदु देई ||२||

नीज रे तान्हीया, आपुले पाळणी.
तुला राखण गवळणी, गोकूळाच्या ||३||

मोठे मोठे डोळे, हरणी पाडसाचे,
जसे माझ्या राजसाचे, नीरज बाळाचे ||४||

मोठे मोठे डोळे, भिवया चंद्रज्योती,
चांगली म्हणू किती, रिया बाळाला ||५||

मोठे मोठे डोळे, भिवया लांबरूंद
कपाळी लावा गंध, निशांत बाळाला ||६||

रिया बाळ खेळे, तिच्या पाई घालू वाळे,
निवतील डोळे, सखियांचे ||७||

नीरजबाळचा खेळ, कोणी गं मांडियेला,
राखफुलाला धाडीला, निशांत बाळ ||८||

आमंचा निशांता बाळ, आम्हांला आवडे,
दारीचे केवडे, जून झाले ||९||

आमंचा नीरज बाळ, आम्हांला हवा हवा,
देवाजीने द्यावा, जन्मभरी ||१०||

माझ्या गं अंगणातं, सांडिला दुधभातं,
जेविला रघुनाथ, निशांत बाळ ||११||

माझ्या गं अंगणातं, सांडिली दुधपोळी,
जेविली चाफेकळी, रियाबाई ||१२||

नीरज बाळ खेळे, अंगणी ओसरी,
त्याला संगत दुसरी, निशांत बाळाची ||१३||


माझ्या गं दारावरनं, दहापंधरा गाड्या गेल्या,
भावाने बाहिणी नेल्या, दिवाळीला ||१४||

जत्रा

       गेल्या आठवड्यात पुण्यात PIFF म्हणजेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. पिफला जायची यंदाची माझी पहिलीच वेळ. आधी पिफ बद्दल खूप ऐकलं होतं त्यामुळे पहायची खूप उत्सुकता होती. शिवाय मराठी, इंग्रजी, हिंदी ह्या भाषांव्यतिरिक्त इतर भाषांमधले चित्रपट पहायची पहिलीच वेळ असल्याने तो अनुभव कसा असेल हे ही माहित नव्हतं.

        मित्रमंडळींपैकी कोण कोण आहे हे साधारण पहिल्या दुसर्‍या दिवशी कळलं आणि मग रोज सकाळी SMS, फोन, पिंग करून ठरवाठरवी सुरु झाली. कॅटलॉगमध्ये सिनेमाबद्दल वाचायचं, त्यातुन फार काही कळलं नाही तर गुगलवर शोधाशोध करायची. एका मित्राच्या ओळखीतले एक जण पिफच्या सिलेक्शन कमिटीमध्ये होते. त्यांच्याकडूनही काही काही चित्रपटांची नावं समजली होती. पिफचं आयोजन एकंदरीत नेटकं होतं. फार भपकेबाज नाही पण तरीही खूप व्यवसायिक पद्धतीने केलेलं. यंदाच्या पिफची मुख्य संकल्पना 'Celebrating 100 years of Indian Cinema' अशी होती. वर्ल्ड कॉम्पिटीशन, ग्लोबल सिनेमा, रेट्रो सिनेमा (ह्यात स्मिता पाटील, यश चोप्रा ह्यांचाही समावेश होता), इंडीयन सिनेम आणि आजचा मराठी चित्रपट असे विभाग ह्याशिवाय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फिल्म्सची स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम होता. हिंदी, इंग्रजी चित्रपट बघायचे नाहीत असं ठरवलं होतं. मराठी चित्रपट संहिताचा प्रिमीयर होता म्हणून आणि 'बालक पालक' बद्दल खूपच ऐकलं होतं म्हणून जायचं होतं पण संहिताची वेळ जुळली नाही आणि बालक पालकला जागा मिळाली नाही म्हणून दोन्ही पहायचे राहिले. चार दिवसांच्या काळात एकंदर ११ चित्रपट हाती लागले. १ हिब्रू, १ टर्की, १ इटालियन, १ फिनीश, १ नॉर्वेजियन, १ फ्रेंच, १ सर्बियन आणि बाकीचे जर्मन/पोलीश.

        पाहिलेल्या चित्रपटांबिषयी थोडसं :
१. एपिलॉग - हायुता अँड बर्ल : हा पिफचा उद्घाटनाचा सिनेमा होता. कहाणी एका वयस्कर इस्रायली जोडप्याची. कम्युनिस्ट विचारसरणीच्या ह्या जोडप्याला आत्ताच्या जगाशी जुळवून घेणं हळूहळू अवघड जायला लागतं. मुलगा वडिलांशी पटत नाही म्हणून अमेरिकेला निघून गेलेला. आर्थिक चणचणही भासत असते. अश्यात एका रात्री त्यांच्यात भांडण होतं. ते मिटवून ते दोघे आपल्या येऊ घातलेल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. अखेर सेवाभावी संस्था काढायचं स्वप्न बाजूला ठेवून अखेरच्या प्रवासाला निघून जातात. कम्युनिस्ट आणि आधुनिक विचारसरणीतला संघर्ष इस्राइलमध्येही आहे हे अजिबात माहित नव्ह्तं. नायक नायिका दोघांचीही कामं उत्तम झाली आहेत. सुरुवात करण्यासाठी अगदी योग्य सिनेमा होता.

 २. कुमा : तुर्कस्तान : कुमा म्हणजे सवत.व्हेनिसमध्ये रहाणार्‍या टर्की फॅमिलीत घडणारी ही गोष्ट मस्त फुलवली आहे. सुन म्हणून लग्न करून आणतात पण सासरी आल्यावर तिला कळतं की ती खरतर सवत आहे. तसं असण्याची कारणंही नंतर कळतात. आधी ती हादरून जाते पण नंतर जुळवून घेते. पुढे त्या दोघींमधलं नातं कसं वळणं घेत जातं ते मस्त दाखवलं आहे. प्रमुख भुमिका करणार्‍या दोन्ही कलाकारांची काम सुरेख झाली आहेत. सगळेच कलाकार अगदी टिपीकल टर्की चेहेरापट्टी, शरीरयष्टीचे आहेत. एकंदरीत सुरेख सिनेमा.

३. द अ‍ॅडवेंचर : रेट्रो प्रकारातला हा सिनेमा मायकेलँजेलो ह्या दिग्दर्शकाचा, साधारण १९६०च्या आसपास आलेला. इटालियन मित्र मैत्रिणींचा ग्रुप समुद सफरीला निघतो आणि एका बेटावर येऊन पोहोचतो. त्यातली एक मुलगी ह्या बेटावर गायब होते. मुलीचा मित्र आणि मैत्रिण तिचा शोध घेता घेता एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि शेवटी आपल्या हरवलेल्या मैत्रिणीला विसरून जातात. ब्लॅक आण व्हाईट सिनेमा जरा संथ वाटला तरी ज्या काळात तो बनला ते लक्षात घेतलं तर ठिक वाटतो.

४. रोझः १९४५ साली दुसर्‍या महायुद्धानंतरच्या पोलंडव्याप्त जर्मन भागात घडणारी ही कथा. एका मृत जर्मन सैनिकाच्या पत्नीची आणि त्या सैनिकाच्या सहकार्‍याची. साम्यवादी पगडा असलेल्या ह्या भागात सामान्य नागरिकांवर, स्त्रियांवर झालेले अत्याचार, दडपशाही ह्यांचं वास्तववादी चित्रण ह्यात आहे. प्रचंड अंगावर येणारा सिनेमा पाहून झाल्यावर डोकं सुन्न होतं. ह्या चित्रपटाला वर्ल्ड कॉम्पिटीशनमध्ये बक्षिस मिळालं.

 ५. द टो रोप : मेक्सिकोमध्ये युद्धानंतर घडणारी कथा. युद्धामध्ये आई वडिल गेल्यानंतर आपल्या दुरच्या काकांकडे एक मुलगी येते. हे काका गेस्ट हाऊस चालवत असतात. तिथे उतरायला येणारे प्रवासी सोडून सगळं असतं. ह्या काकांचा मुलगा, त्यांना ही जागा सोडून शहरात यायला सांगत असतो कारण त्याला पुन्हा युद्धाची शक्यता वाटत असते. एका सकाळी काका आणि त्यांचा मुलगा हिला एकटीला सोडून शहरात सोडून जातात. आणि युद्ध आणि नंतर युद्धाची शक्यता तिला पुन्हा एकटं पाडते. कथा अतिशय संथपणे पुढे सरकते. मेक्सिकोच्या खेड्यामधलं चित्रीकरण सुरेख आहे. सगळ्या परिसरातला निसर्ग फार सुरेख दाखवला आहे.

 ६. होम फॉर अ विकेंड: एका जर्मन परिवारात घडणारी ही गोष्ट. एका विकेंडला आई वडिल आपल्या मुलांना दोन महत्त्वाच्या घडामोडी सांगतात. ह्या दोन्ही गोष्टींचा त्या परिवारावर होणारा परिणाम, प्रत्येक सदस्याचे वैयक्तिक आयुष्य आणि परिवारातल्या वेगवेगळ्या नात्यांचा वेध ह्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवल्या आहेत. जर्मन घर आणि वातावरण तसेच आसपासचा परिसर ह्यांचे चित्रण सुरेख आहे.

७. द परेडः सर्बियात घडणार्‍या ह्या सिनेमात गे लोकांच्या प्रश्नाला हात घातला आहे. गे लोकं शहरात एक परेड करायची तयारी करत असतात आणि त्यांना मानवी हक्कांची मागणी करायची असते. सनातनी लोकांचा ह्याला अर्थातच विरोध असतो आणि त्यामुळे ह्या दरम्यान त्यांना अनेक अडचणी येतात. काही घडामोडींमुळे ज्युडो कराटेचे क्लास घेणारा एक जण आणि त्याची मैत्रिण ह्यांना परेडसाठी मदत करायला तयार होतात. अखेर ही परेड पार पडते पण त्यांच्यातल्या एकाचा दुर्दैवी मृत्यू होतो. विनोदी अंगाने जाणारे संवाद विनोदांच्या मध्ये जोरदार फटके मारतात. पूर्व युरोपिय देशांमधली स्पर्धा, शत्रृत्त्व ह्या संवाद/विनोदांमध्ये खूपदा डोकावतं. पूर्व युरोपातल्या देशांचं चित्रीकरण सुरेख आहे. एकंदरीत मस्ट वॉच सिनेमा !

 ८. बार्बरा: हा ही चित्रपट दुसर्‍या महायुद्धोत्तर काळातला. पूर्व जर्मनीवर पोलादी पडदा असताना तिथल्या नागरिकांवर अनेक निर्बंध होते. सरकारचं नागरिकांच्या हालचालींवर बारिक लक्ष असे. बार्बरा ही एक बालरोगतज्ज्ञ. तिने आपल्याला सेवेतून मुक्त करण्यासाठी अर्ज केलेला असतो. ती तिथून पळूण जाण्याचे प्रयत्नही करत असते. परंतु एक एक केस हातावेगळी करताना ती तिथल्या परिस्थित गुंतत जाते. सरकारी कामगारांच्या चेहेर्‍यांमागे शेवटी आपल्यासारखीच माणसे आहेत ह्याची तिला जाणीव होते आणि मग पळून जायची संधी असताना ती माघार घेते. बार्बला चित्रपटालाही स्पर्धेत बक्षिस मिळालं. प्रत्येक कलाकाराच अभिनय उत्त्म होता, तसचं वातावरण निर्मितीही सुरेख होती.

 ९. द ओरहॅम कंपनी: दारूडा बाप, सोशिक आई, बंडखोर मुलगा अशी अगदी भारतीय शोभेल अशी ह्या नॉर्वेजियन चित्रपटाची कथा. सगळ्या कलाकरांचे खूपच नैसर्गिक अभिनय आणि अतिशय संयत हाताळणी ही ह्या चित्रपटाची वैशिष्ट्ये. शिवाय नॉर्वेमधलं अप्रतिम निसर्ग सौंदर्यही वारंवार दिसत रहातं.

१०. हेला डब्लू : ही पुन्हा दुसर्‍या महायुद्धाशी संबंधीत कहाणी. अनेक युरोपिय देश त्यांची चूक किंवा इच्छा नसताना दुसर्‍या महायुद्धात ओढले गेले. फिनलँडही त्यातलाच एक. हेला ही फिनलँडमधली प्रथितयश उद्योजक, लेखिका, कवी, नाटककार. फिनलँडमध्ये शांतता नांदावी म्हणून ती तिच्या ओळखी आणि वजन वापरून सोव्हिएट युनियनशी वाटाघाटी करते. पण पुढे तिच्या वर फितुरी आणि देशद्रोहाचे आरोप येतात आणि तिची रवानगी तुरुंगात होते. युध्द संपल्यानंतर तिची सुटका होते. युद्ध अगदी प्रत्यक्ष दाखवलं नसलं तरी युद्ध चालू असल्याची जाणीव चित्रपटभर होत रहाते. ह्या चित्रपटाचं पार्श्वसंगीत अतिशय उत्कृष्ठ होते. खरतर मी बालक पालक हा गाजत असलेला मराठी सिनेमा पाहायला गेलो. पण तिथे जागा न मिळाल्याने शेजारच्या स्क्रीनला जाऊन बसलो आणि हा उत्तम चित्रपट पाहायला मिळाला.

११. ३७ विटनेसेस : फ्रान्समध्ये भरवस्तीत एका महिलेलेचा खुन होतो. आसपासच्या परिसरात रहाणारे ३७ लोकं आम्ही काहीच पाहिलं किंवा ऐकलं नाही अशी साक्ष देतात. अडतिसाव्याला मात्र रहावत नाही तो नंतर जाऊन पोलिसांना किंचाळण्याचे आवाज ऐकू आल्याचं सांगतो. नंतर सगळेच जण आपली साक्ष फिरवतात. सुरुवातीला 'मर्डर मिस्ट्री' वाटणारा चित्रपट खुन कोणी केला वगैरे तपशीलात शिरण्याऐवजी झालेल्या घटनेमुळे लोकांच्या मनावर आणि वागण्यावर झालेल्या परिणामांवर जास्त भाष्य करतो. एकंदरीत सिनेम्यांची जत्रा विविध विषय, उत्तम हाताळणी, उत्कृष्ठ दिग्दर्शन आणि अभिनय आणि नेत्रसुखद चित्रीकरण ह्यांच्यामुळे एक वेगळाच अनुभव देऊन गेली.(युरोपचं सौंदर्य बघून आता तिथे जायची इच्छा होते आहे!) अन्यथा हे सगळे चित्रपट मी कधी बघितले असते किंवा कधी बघितले असते का कोण जाणे!